कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दीनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तेराव्या ते सतराव्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली होकायंत्रे, नकाशे अशी दिशादर्शक उपकरणं, जहाजांची निर्मिती, चाकांचा शोध, सायकल, रेल्वे, मोटरगाड्या, फुगे, एअरशिप्स, अवकाशयानं यांच्या निर्मितिकथा, उपयुक्तता, इतर गमतीजमती आणि अनेक रंजक कथा यांनी परिपूर्ण असलेलं तसंच भविष्यातल्या वाहनांचाही वेध घेणारं पुस्तक म्हणजे 'प्रवास' !
Acc. No. 34661
जीवशास्त्रावरचं हे पुस्तक अत्यंत सुस्पष्ट, सुबोध आणि सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. सजीवांबद्दलच्या सगळ्या संकल्पना आणि सखोल ज्ञान यात रंजक भाषेत दिलेलं आहे. जीवशास्त्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकानंच हे पुस्तक वाचण्यासारखं आणि संग्रहात ठेवण्यासारखं अमूल्य आहे.
Acc. No. 34662
आज सगळीकडे 5G, जीपीएस, जीपीआरएस, जीआयएस, गुगल ग्लास, गुगल मॅप्स, सेन्सर्स, 3D प्रिंटिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, बिग डेटा, डेटा एन्क्रिप्शन/कॉम्प्रेशन, डेटा मायनिंग, डेटा अॅनालेटिक्स, एम्बेडेड सिस्टिम्स, सॅटेलाईट्स, आरएफआयडी, ऑग्मेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्यूअल रिअॅलिटी, ब्लॉकचेन, बिटकॉईन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0, क्वांटम कॉम्प्युटर्स, नॅनोकॉम्प्युटर्स, बायोकॉम्प्युटर्स आणि असे अनेक शब्द आपण रोज ऐकतो आणि आपल्याला उगाचच त्यांची भीती वाटते. या सगळ्यांची भीती मनातून काढून टाकण्यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे. ज्यांची कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीशी काहीही ओळख नाहीये अशांकरताही हे पुस्तक लिहिलंय आणि ज्यांना थोडीफार त्यातली माहिती आहे त्यांनाही हे पुस्तक भरपूर काहीतरी देऊन जाईल. इंग्रजीत 'कॉम्प्युटर्स फॉर डमीज' किंवा 'इडियट्स गाईड' अशा तऱ्हेची जी पुस्तक असतात, त्याहीपेक्षा हे पुस्तक आठवीतल्या मुलालाही कळेल अशा अत्यंत सोप्या भाषेत मांडलेलं आहे. यासाठी पूर्वज्ञानाची गरज नाही. बिट्स आणि बाईट्सपासून सुरुवात करून कॉम्प्युटर्स कसे चालतात, इंटरनेट कसं चालतं, मोबाईल कसे काम करतात, इथपासून वर सांगितलेल्या सगळ्या अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख आपल्याला या पुस्तकात होईल.
Acc. No. 34663
मेसापोटेमिया, चीन, रोम, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका आणि भारत या देशांमधल्या तसं मुस्लिम कायद्यांचा चित्तथरारक इतिहास. याशिवाय सर्वसामान्यांना माहीत हवे असे भारतीय कायदे या सगळ्यांची माहिती देणारं पुस्तक म्हणजे 'माय लॉर्ड'. न्यायसंस्थेचा विकास कसा झाला या संदर्भातलं हे पुस्तक अच्युत गोडबोले यांनी आपल्या नेहमीच्या भरगच्च, मात्र साधार माहिती पुरवण्याच्या शैलीनं लिहिलं आहे व त्याला सहलेख माधुरी काजवे यांनी योग्य साथ दिलेली आहे.
Acc. No. 34664
'संगणक' या यंत्राची कल्पना बरीच जुनी आहे. नेपियर आणि पास्कल यांच्यासारख्या गणितज्ञांच्या काळापासून सुरू झालेला संगणकाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे. या काळात संगणकाची संकल्पना, त्याचा आकार, त्याच्याशी संबंधित असलेलं सॉफ्टवेअर यांत आमूलाग्र बदल झाले आहेत. सुरुवातीच्या यांत्रिकी तत्त्वांवर आधारित असलेल्या संगणकांचं रूप विजेवर चालणाऱ्या संगणकीय युगानं बदलून टाकलं. त्यानंतर ट्रान्झिस्टर आणि •आयसी याच्या शोधांमुळे तर संगणक पार बदलले. छोट्या आकाराचे आणि खूप जास्त क्षमतेचे संगणक तयार झाले. आता तर अनेक जणांच्या मनगटावर छोटा संगणक 'स्मार्ट वॉच' च्या रूपानं दिसतो!
संगणकाचा हा प्रवास अक्षरश: थक्क करून सोडणारा आहे. या अद्भुत आणि रंजक वाटचालीचे असंख्य शिलेदार आहेत. त्यांच्या अविस्मरणीय आणि काही वेळा अविश्वसनीय कहाण्या आहेत. या तंत्रज्ञानांचा प्रवास समजून घेणंसद्धा अत्यंत मनोवेधक आहे.
Acc. No. 34665
आजची जागतिक प्रगती ही पूर्णत: औद्योगिक क्रांतीवर अवलंबून आहे अन् ही औद्योगिक क्रांती आधुनिक नव्हे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या भक्कम पायावर वेगाने विकसित होताना दिसते आहे. ए. आय., इन्फोटेक, नॅनोटेक, बायोटेक, रोबोटिक्स, बिग डेटा, क्रिप्टोकरन्सी अशा एकापेक्षा एक गुंतागुंतीच्या संकल्पनांवर ह्या भविष्यकालीन आधुनिक तंत्रज्ञानाचा अन् पर्यायाने औद्योगिक क्रांतीचा डोलारा उभा आहे. भविष्यकालीन विश्व हे जितके विलक्षण तितकेच अद्भुत असणार आहे. हे सारे विषय समजायला तसे कठीण अन् विलक्षण गुंतागुंतीचे. पण अशा क्लिष्ट विषयांना, संकल्पनांना सध्या, सोप्या व सरळ मातृभाषेत समजावून सांगण्याचे असिधारा व्रत डॉ. अच्युत गोडबोले ह्याने घेतले आहे. 'इंडस्ट्री ४.०' हे नवे पुस्तक ह्याच मालिकेतले. औद्योगिक क्षेत्रात काही नवे करू पहाणाऱ्या जिद्दी, महत्त्वाकांशी तरुणांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नव्या औद्योगिक क्रांतीची तोंडओळख करून देणारे हे पुस्तक निश्चितच वाचनानंद प्रदान करणारे ठरेल. ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी डॉ. अच्युत गोडबोले ह्यांच्या लेखनाचा फार मोठा वाटा आहे.
Acc. No. 34666
मानवी शरीर प्रणाली, त्याची रचना व कार्य हे अत्यंत जटिल आणि समजून घेण्यास कठीण आहे; परंतु अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी अत्यंत सोप्या व रसाळ भाषेत ते सर्वसामान्यांपर्यंत ह्या पुस्तकाद्वारे मांडले आहे. त्यांचे हेही पुस्तक त्यांच्या इतर पुस्तकाप्रमाणे संशोधनावर आधारित व सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांचे निरसन होईल असेच आहे. शरीरातील प्रत्येक विभाग (पचनसंस्था, मज्जासंस्था इत्यादी) यांचा इतिहास, रचना आणि त्याचा विविध आजारांशी असलेला संबंध त्यांनी सुंदररीत्या या पुस्तकात मांडला आहे, त्यामुळे हे पुस्तक आकर्षक झाले आहे. केवळ सामान्य व्यक्तीच नव्हे तर डॉक्टर्स व इतर आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींनादेखील हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
Acc. No. 34667
ओघवती सुगम भाषा, वैज्ञानिक संकल्पनांची, संशोधनाची केलेली अतिशय लक्षवेधी मांडणी आणि गोष्टीवेल्हाळ रूपानं केलेलं वैज्ञानिक कथन यांच्या मिलापातून 'सूक्ष्मजंतू ' हे देखणं पुस्तक साकार झालं आहे. या पुस्तकात सूक्ष्मजंतूच्या अन्वेषणाच्या जोडीला संशोधनासाठी वापरलेल्या छोट्याछोट्या बारकाव्यांचं केलेलं रसाळ वर्णन लेखकांच्या ज्ञानाच्या उत्तुंगतेबद्यल खूप काही सांगून जाते. 'तो मी नव्हेच', 'आपले आरोग्य आपल्या पोटात!' ही प्रकरणे वाचकांना खिळवून ठेवणारी, नवी माहिती देणारी आहेत.
Acc. No. 34668
'व्हिटॅमिन्स' हे पुस्तक संशोधनावर आधारित, अत्यंत अभ्यासपूर्ण व विषयाची सर्वांगीण ओळख करून देणारे आहे. कोणत्याही विषयाला मुळापासून मिळून सर्वसाधारण अनभिज्ञ वाचकांसाठी ते सहज-सोपे करून मांडणे हे अच्युत गोडबोले व डॉ. वैदेही लिमये यांचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्हिटॅमिनच्या संशोधनाचा इतिहास; तसेच त्याची आजच्या युगातील उपयुक्तता व त्यासंबंधित विवेचन वैद्यकीय व्यावसायिकांसही वाचनीय आहे.
Acc. No. 34669
'गणिती' हा वाचनीय ग्रंथ सर्वसाधारण वाचकांसाठी गणिताच्या इतिहासाचा पट सुंदरपणे उलगडून दाखवतो; या लक्षवेधक इतिहासातून अवगाहन करत असताना, ते गणित निर्माण करणाऱ्या महत्त्वाच्या मोठमोठ्या गणितज्ज्ञांच्या विविध घटनांनी भरलेल्या जीवनाशीही वाचकाला अर्थपूर्ण असा चांगला परिचय होत जातो. यातूनच गणिताच्या अतिरथी-महारथीमध्ये गणिताचा बादशहा कोण, गणिताचा शापित यक्ष कोण, निर्धन असूनही गणिताची श्रीमंती अंगाखांद्यांवर मिरवणारा गणिती कोण, जगाला कोडी घालणारा गणिती कोण, गणिताचा शिल्पकार हे बिरूद समर्थपणे पेलणारा गणिती कोण, प्रज्ञावंत असूनही विनम्र राहणारा गणिती कोण, गणितींमधलं अतिसुप्रसिद्ध घराणं कोणतं, गणिताच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी ज्यांची नावं लिहिता येतील असे गणिती कोणते या संबंधातलं ज्ञान वाचकाला होत राहते व ती अतीव गोडीनं पुढेपुढे वाचतच राहतो. त्याचप्रमाणे गणिताच्या या इतिहासाबरोबर गणितातील काही महत्त्वाच्या प्रमुख विषयांचं आजकालच्या दिवसांत सर्वसाधारण व्यक्तीला जेवढं ज्ञान आवश्यक आहे. तेवढं ज्ञानही हे पुस्तक समर्थपणे देत राहते. अशा तन्हेने गणिताच्या इतिहासाविषयीची आस्था व कुतूहल वाढवत गणिताच्या आवश्यक तेवढ्या प्राथमिक ज्ञानाचा काही भाग सुलभपणे देणारे हे पुस्तक.
Acc. No. 34670
अच्युत गोडबोले व त्यांचे सहकारी सर्वसामान्यांच्या ज्ञानकक्षा व जाणिवा रुंदावणारे विविध विषय हाताळतात. यावेळी वैद्यकायन या ग्रंथमाध्यमातून त्यांनी मानवी आरोग्याशी संबंधित अनेक बाबींचा धावता आढावा घेतला आहे. यात अनादि काळापासूनचा वैद्यक इतिहास सादर केला आहे. त्यातून आधुनिक वैद्यकाच्या संकल्पना कशा प्रत्यक्षात आल्या व विकसित होत गेल्या, याचे टप्प्याटप्प्याने वर्णन करण्यात आले आहे. मला एक वैद्यक प्राध्यापक व तज्ञ उपचारक म्हणून लोकांना जे माहित असायला हवे असे वाटते, त्यातील अनेक बाबी यात समाविष्ट आहेत. रुग्णाप्त जेवढे स्वास्थ्यशिक्षित, जागरुक व समंजस, तेवढे त्यांना स्वास्थ्यक्षण करणें व आजारपणात काळजी घेणे नीट जमते. त्या दृष्टीने मराठी वाचकांना वैद्यकविज्ञानविषयक मूलभूत माहिती सहज देणारे असे हे लेखन आहे. सहाशे पानी वाचनात कुठेही कंटाळा येत नाही, उलट उत्कंठा वाढते.
"माणसाच्या हवेबाबतच्या पूर्वापार चालत आलेल्या अनेक कल्पना; हवेबाबतचं विज्ञान-हवेचे नियम आणि घटक यांचा शोध; हवेबाबत अनेक संकल्पना विकसित करणारे लेव्हायजे, बॉईल यांसारखे शास्त्रज्ञ, त्यांची आयुष्यं, त्यांनी केलेले प्रयोग, त्यांच्याकडून घडलेल्या चुका यांची सुंदर गुंफण म्हणजे 'हवा'!"
दुःख- दैन्य आणि अपेक्षा यांनी पछाडलेल्या, सर्वस्व नष्ट झालेल्या भटक्या-विमुक्तांच्या समाजात स्वत्व, स्वाभिमान, परिश्रम यांचे बीज पेरायचे आहे. लक्ष्मण माने यांनी 'उपरा'पासून असे प्रयत्न चालवले आहेत. 'बंद दरवाजा', 'पालावरचं जग', किंबहुना त्यांचे सारे लेखन हे त्यांच्या या प्रयत्नांचे आविष्कार आहेत. ते मुळी म्हणतातच, की 'मी प्रथम कार्यकर्ता आहे आणि कार्य पुढे जावे म्हणून मी लिहितो. ' भटक्या-विमुक्तांच्या वस्त्या - पालं यांचा शोध घेऊन, त्यांच्याशी गप्पा मारून त्यांची स्थितिगती आणि त्यांचे प्रश्न त्यांनी भेदकपणे मांडले आहेत....
Acc. No. 34673
" 'उपरा' हा मीच माझा घेतलेला शोध होता. गेलं दीड वर्ष मी माझ्याबरोबरच भटक्या-विमुक्तांच्या उपरेपणाचा शोध घेतोय. इतकं विलक्षण जग! दुःख, वेदना, दारिद्र्य आणि अश्रू यांशिवाय त्यांच्या वाट्याला काहीही आलेलं नाही."
Acc. No. 34674
मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमधून जात असताना गौर गोपाल आणि त्यांचा तरुण, श्रीमंत मित्र हॅरी गप्पा मारू लागतात. 'माणसाची आजची अवस्था विषयावर बोलता-बोलता आयुष्य, त्यामागचा अर्थ, शाश्वत आनंद असे अनेक विषय बोलण्यात येतात. नाती दृढ करणं असो, स्वतःची खरी शक्ती शोधणं असो, कार्यालय ठिकाणी स्वतःतले उत्तम गुण शोधणं असो किंवा या जगाला काहीतरी भेट देणं असो गोपाल दास आपल्याला त्या संदर्भात अविस्मरणीय अशी सफर घडवून आणतात. संच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे वावरण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे मौलिक दृष्टिआहे. तो जाणून आपणही संपन्न होतो. आजच्या घडीला, दास ह्यांचे अगणित अनुयायी आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ लाइफ कोचपैकी ते एक आहेत. त्यांनी आपलं जीवनज्ञान लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. जीवन समजून घेताना... ह्या त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातून आपल्याला त्यांचे जीवनानुभव अवगत होतात. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडलेल्या त्यांच्या विचारांतून आपल्याला जगण्यासाठीचे अनेक चपखल उपाय सहजगत्या प्राप्त होतात.
Acc. No. 34675
डॉ. अभय बंग, एम. डी. गडचिरोली सारख्या आदिवासी भागात स्वयंप्रेरणेने राहून आरोग्यसेवा देणारे डॉक्टर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, वयाच्या चव्वेचाळिसाव्या वर्षी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
. हा हृदयविकार खरंच अचानक झाला का ? की वर्षानुवर्षं तो रोज होतच होता; फक्त मला एक दिवशी अचानक जाणवला ? मृत्यूच्या जवळून दर्शनाचा माझ्या मनावर काय परिणाम झाला? माझ्या हृदयरोगाचं कारण मला काय सापडलं? हृदयरोगातून बाहेर येण्यासाठी मी काय केलं? मी हृदयरोगाचा उपचार करण्याऐवजी हृदयरोगानेच माझा उपचार कसा केला?" ही कहाणी १९९६ साली 'साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली. तिने जणू पूर्ण महाराष्ट्राला हलवून सोडलं. लक्षावधी लोकांनी ती वाचली, इतरांना दिली. हृदयरोगतज्ज्ञ आपल्या रुग्णांना औषधासोबत तो लेख द्यायला लागले. त्या वर्षीचा उत्कृष्ट ललित कृतीचा स्व. अनंत काणेकर पुरस्कार त्या लेखाला मिळाला. पुस्तकरूपात ती कहाणी आता उपलब्ध होते आहे. " हृदयरोगामुळे माझ्या जीवनात सुरू झालेला शोध मला हृदयरोगापलीकडे घेऊन गेला. नंतर तर तो पुढला शोधच मध्यवर्ती झाला. ‘सकाळ’मधला लेख लिहिल्यावर देखील तो शोध सुरूच राहिला. तो माझा नंतरचा प्रवास देखील इथे सांगितला आहे." शिवाय रुग्णांना, जिज्ञासूंना गरज पडते अशी माहिती शेवटी वेगळ्या प्रकरणात समाविष्ट केली आहे. आणि या कहाणीचा अंतही झालेला नाही. अजूनही रोज काहीतरी घडतं आहे.
Acc. No. 34676
या जीवनाचे काय करू ? माणसासमोर उभा असलेला एक सनातन धरন! आपल्या जन्मासोबतच हा प्रश्नही जन्माला त्याचे उत्तर शोधल्याशिवाय समाधान नाही। ... पण हा शोध सोपाही नाही.
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात मदत व्हावी,
या हेतूने घेऊन येत आहोत... अभय बंग यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचा व दिलेल्या भाषणांचा निवडक संग्रह.
Acc. No. 34677
काश्मीरमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला असताना पं. नेहरूंनी शास्त्रींना तेथे तातडीने पाठविले होते. श्रीनगर येथे गोठवणारी थंडी असल्याने पं. नेहरूंनी स्वतःचा ओव्हरकोट शास्त्रींना दिला. जणू पुढील जबाबदारी शास्त्रींच्या खांद्यावर येणार याचेच ते सूचक होते !
पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२च्या चीन युध्दातील मानहानीकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर, १९६५च्य भारत-पाक युध्दात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्त्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली. 'जय जवान, जय किसान'च्या मंत्राने सारा देश भारावून गेला.
ताश्कंद शिखर परिषदेत, मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर अयुबं खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक त्यांचे अवतारकार्य संपुष्टात आले ! ... तीच ही कहाणी तीस वर्षांनंतर, दप्तरमुक्त झालेल्या अनेक सत्य घटनांच्या साक्षीने लिहिलेली प्रभावी, प्रेरक नि पारदर्शक व आजही भारावून टाकणारी जीवनगाथा !
Acc. No. 34678
‘गावातल्या गोष्टी' गोष्टींमध्ये ग्रामीण जीवनाची भेदक चित्रं आहेत. संवेदनशील मन असलेल्या तुमच्यासारख्या कलावंताच्या हातून असा कारुण्याचा सूर उमटणं अपरिहार्य आहे. सत्ताधाऱ्यांनी स्वार्थापोटी सर्वसामान्य माणसाला एकतर भिकारी किंवा गुंड बनवण्याचा जो उद्योग चालवला आहे तो पाहिल्यावर तुकोबांसारखं 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' असं म्हणण्यापलीकडे काही सुचत नाही.
Acc. No. 34679
Acc. No. 34680
संशोधन हे 'जुनाट ' न होता सतत अपडेट् करीत राहिले पाहिजे. तौलनिक अभ्यास, आंतर्विद्याशाखीय अभ्यास संशोधनसंलग्न अभिक्रिया, 'साहित्यांची विज्ञानाशी होणारी जवळीक, राजकारण व समाजकारणात 'भाषाप्रभुंना ' मिळणारी सत्ता, ही भाषेची आणि संशोधनाची ताकद आहे. आजपर्यत मराठीच्या संशोधकांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. यासाठी या पुस्तकात संशोधन कशाचे, कसे, त्याचे नियोजन व मांडणी विविध संकल्पनाचित्रातून करुन दाखविली आहे.
Acc. No. 34681
गेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्धधर्म सुपरिचित आहे. जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले.
बौद्धधर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे. बुद्धलीला सारसंग्रहातील बुद्ध चरित्र हा भाग या ग्रंथातील कथांमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी उत्तम प्रकारे सादर केलेला आहे. बौद्धधर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगतपणे जुळवून घेण्याचे काम बुद्ध चरित्र हा ग्रंथ करतो.
आचार्य धर्मानंद कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६- जून २४, १९४७) हे एक अद्वितीय विद्वान, बौद्धधर्म, पाली भाषेचे अभ्यासक व लेखक होते. वयाच्या २३ व्या वर्षी गोव्यातील आपले घर व कुटुंब सोडून तथागत बुद्धांच्या उपदेशाच्या शोधात अनेक संकटांचा सामना करीत त्यांनी नेपाळ, सिलोन, ब्रम्हदेश वगैरे देशांत फिरून बौद्ध साहित्य आणि बौद्ध धर्मसाधना यांचे अनुशीलन केले. कोसंबी यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदया विद्यापीठात बौद्धधर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला.
आचार्य धर्मानंद कोसंबीरचित प्रस्तुत बुद्ध चरित्र अत्यंत रसाळ असून गौतम बुद्धाचा इतिहास जाणून घेण्यास आतुर असलेल्या उपासकांची तहान शमविणारे आहे. जरा, व्याधी आणि मरण यांचं अवलोकन करून अशांत झालेला सिद्धार्थ आणि त्यानंतर गृहत्याग करून निर्वाणपदाकडे वाटचाल करणाऱ्या गौतम बुद्धांचं सुभग दर्शन आपल्याला या चरित्रातून घडते.
Acc. No. 34682
कवी कैलास दौंड यांची कविता आजच्या ग्रामीण वास्तवाचे प्रखर आणि जीवघेणे दर्शन घडविणारी आहे. उद्ध्वस्त होत जाणारी मराठी गावं, तेथील शेतीची झालेली संपूर्ण वाताहत, बेभरवशाचा पाऊस, कधी मुळीच न पडणाऱ्या पावसामुळे ओसाड पडणारी रानं, तर कधी अवेळी पडणाऱ्या पावसामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांची झालेली धूळधाण, त्यातूनच विद्यमान ग्रामीण समाजातून तरुण पिढी 'देशांतराला' जाते; म्हणजे कसाबसा जगण्याचा प्रयत्न करू पाहते आहे. अशा विद्यमान ग्रामीण सामाजिक आशयाची श्री. दौंड यांची कविता आहे. ती ठोस दणकट तरी स्वाभाविक ग्रामीण प्रकृतीची प्रासादिक कविता आहे. नाजूक, नखरेल, काव्याळ शब्दांचा धोशा लावणारी नाही. प्रतिमा- अलंकारांनी अकारण नटलेली नाही. ग्रामीण लोकजीवनातील 'अष्टाक्षरी छंद' ती प्रामुख्याने अनुसरते. आविष्कारासाठी ग्रामीण भाषेचाच उपयोग करते. कवीची प्रकृती काव्यात्म तर आहेच; पण कवितेतील उपरोध आणि नाट्य विशेष लक्ष वेधून घेतांना दिसते.
Acc. No. 34683
पूर्वी बोलायची झाडं माणसाशी माणसापेक्षाही मनमोकळेपणानं.गावात एखादा संत महंत आला म्हणजे झाडांचा आनंद ओसंडून वाहायचा पाना-फुलांमधून. त्याच नजरेनं माणूसही संवादीत व्हायचा आता हा संवादच महानुभावांशी. करायला लागला सोयीस्कर साठमारी. तेव्हा कशाचा भरवशावर ओढायचा गाडा ?
Acc. No. 34684
एकाकीपण ही केवळ मानसिकता असते काय ? की, ते त्याहून खरे व मुलभूत वास्तव असते? माणसांना आधार लागतो. तो असला तरी त्यांना कुणी तरी सोबत व हाताशी आहे असे वाटते. तो आधार असला वा गेला तर त्याच्या वाट्याला येते ते एकाकीपण जरा वेगळे असले, तरी तशा एकूणच एकाकी मानसिकतेचा तो भाग असतो. यावर उपाय सांगणारे शास्त्र कोणते ? मानसशास्त्र, धर्मशास्त्र, लहरीपण की एकाकीपणाशी समझोता करण्याची मानसिकता? एक प्रकार याहून वाईट व दुःखद आहे. दीर्घ काळ आजारी असलेली, फार काळ वृद्धत्व जगणारी किंवा कधी काळी वाट्याला आलेले वैधव्य वा विधुरपण सांभाळणारीही माणसे असतात. त्यांच्या एकाकी कळांची कल्पना कशी करायची ? की, तो समाजाचा विषयच नव्हे ?
Acc. No. 34685
गांधीजींच्या संपर्काने आमूलाग्र बदललेल्या विदेशी देशी स्त्रियांचे आयुष्य कसे झपाटल्यागत बदलत गेले हे समजले, तर आपल्या जीवनातील क्षुद्र गळून पडायला मदत होईल. इथे तशी ढोबळ यादी जरी पाहिली तरी आपण थक्क होतो, कारण शेवटी ह्या माणसाचा नि त्याने केलेल्या प्रभावाचा थांग लागणे अशक्य आहे असे वाटते! सोंजा श्लेशिंग, नील्ला नागिनी, मॅडेलिन स्लेड, म्युरिअल लेस्टर, कॅथरिन मेयो, मागरिट स्पिगेल, पॅट्रेशिया केंडल, मागरिट बर्के, ॲन मेरी पीटरसन, मेरी चेस्ली, अन्टोनेट मिरबेल, एलन होरूप अशा अनेक जणी.
त्यांतील काही महायुद्धात होरपळलेल्या, काही आध्यात्मिकतेच्या प्रेमाने आलेल्या, काही शाकाहार, ब्रह्मचर्य, त्याग, खादी, अस्पृश्योद्धार, प्रार्थनेचे सामर्थ्य अशा अनेक वास्तव आणि गूढ संकल्पनांनी भारताबद्दलच्या ओढीने इथे खेचत आल्या. काही टिकल्या, काहींना इथले हवामान झेपले नाही नि परत गेल्या. पण स्वदेशात त्यांनी गांधीविचाराने अनेक संस्था सुरू केल्या. गांधींचा त्यांच्यापैकी बहुतेकींशी पत्रव्यवहार सुरू राहिला. अनेकींनी आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. त्यामुळे गांधींचा काळ नि त्यांच्या विचारांचा ठसा देशी-विदेशी स्त्रियांवर कसा उमटला, हे कळायला मदत झाली. ह्या सर्वांचा धांडोळा घेताना वेगळेच, आज स्वप्नवत् वाटावे असे विश्व मनासमोर साकारत गेले.
Acc. No. 34686
भारतातल्या लहान गावात राहून मोठी स्वप्नं पाहणाऱ्या २० उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या.
Acc. No. 34687
मायबाप हो...!
तुम्हीच म्हणतात
शिका...
शिकलोऽऽ
बसलो....
विद्वानांच्या पंगतीत बसा बोला...!
सांगाऽऽ...!
मी कुठे चुकलो....?..
घोड्याच्या पायात नाल ठोकावी तसा हा प्रश्न व्यवस्थेच्या कपाळावर सणसणीत ठोकून देणारा 'दयन' कादंबरीतला नायक डॉ. गणेश मोहन जाधव, जो एक सी. एच. बी. प्राध्यापक आहे. सी. एच. बी. प्राध्यापकाची अवस्था वेठबिगार कामगारापेक्षाही बथ्थड आहे. कोरडवाहू शेतकऱ्यापेक्षाही दयनीय. असे असूनही त्याच्या दुःखाला समाजव्यवस्थेत जराही सहानुभूती नाही. शिक्षणसम्राट आणि सरकारी यंत्रणेच्या गिरणी व्यवस्थेने जाणूनबुजून ज्यांच्या आयुष्याचे दळण (दयन) पीठ केले आहे, त्या सर्वांचे वास्तव ठळकपणे या कादंबरीतून समोर आले आहे. कादंबरीच्या शीर्षकाची समर्पकताच सांगते की, व्यवस्थेनं सामान्य माणसाचे पीठ करून टाकले आहे. त्याच्या आशा-आकांक्षा, त्याची स्वप्ने साऱ्यांचेच 'दयन' करून टाकले आहे. ही एकट्या गणेश जाधवची गोष्ट नाही. व्यवस्थेने टाचेखाली रगडलेल्या त्या हरेकाची गोष्ट आहे. युवराज पवार यांच्या लेखणीचे यश म्हणजे त्यांनी हा विषय अतिशय टोकदारपणे 'दयन' या कादंबरीत हाताळला आहे. मराठी कादंबरी विश्वात ही कादंबरी अतिशय वेगळी ठरते. संवादशैली जी बोलीभाषेवर आधारलेली आहे तिचा अप्रतिम वापर लेखक या कादंबरीत करतो. शिवाय प्रसंग, निवेदन, वातावरणनिर्मिती इ. बाबत एखाद्या कसबी लेखकासारखी लेखणी 'दयन' या कादंबरीत युवराज पवार यांनी चालवली आहे. त्यामुळे मराठी कादंबरी विश्वात 'दयन' कादंबरी आपलं अजोड स्थान निश्चित करेल यात कुठलीही शंका नाही.
Acc. No. 34688
पणजी, आजी, आई आणि मुलगी अशा हरएक पिढीतील स्त्रीच्या वाट्याला आलेल्या 'फिन्द्रीपणा'च्या (नकुशीपण) वाटा उलगडून दाखवणारी ही कादंबरी. आई आणि मुलीचा जीवनसंघर्ष असणाऱ्या या कादंबरीतील समाजचित्रणास जात व पुरुषसत्तासंबंधाचे बहुल असे संदर्भ आहेत. बाईचा जन्म म्हणजे 'इघीन' आणि 'काटेरी बाभूळबन' असणाऱ्या समाजातील बाईपणाच्या दुःखशोषणाचा कहाणीप्रदेश या कादंबरीतून साकारला आहे. जात, धर्म, पितृसत्ता, लिंगभावाच्या दमनाबरोबर आधुनिक स्त्रीच्या संघर्षकर्तृत्वाची सुफळ कहाणी या कादंबरीतून साकार झाली आहे. पराकोटीचा अभाव, दुःखशोषण, सहनशीलतेबरोबर आत्मसन्मान आणि श्रेयसाची वाट वर्धमान करणाऱ्या आधुनिक स्त्रीची ही व्यथाकहाणी. आर्थिक परावलंबन आणि जात-पुरुषदमण पार्श्वभूमीवर 'शिक्षणशहाणपण' हा स्त्रियांच्या दुःखमुक्तीचा अवकाश आहे याचे विवेकी भान देणारी ही कथनदृष्टी आहे. कादंबरीतील दलित समाजजीवनशैलीच्या तपशीलभरणाने समूहचित्रणाची कक्षा विस्तारली आहे. तसेच आंबेडकरी व स्त्रीवादी विचारव्यूहांच्या दृष्टीने समाजसत्तासंबंध न्याहाळण्याची दृष्टी कादंबरीतून व्यक्त झाली आहे. सुनीता बोर्डे यांची कथनशैली ही गोष्टीवेल्हाळ आहे. आत्मपरता आणि समूहरीतीच्या वास्तव- कल्पाविष्काराची बेमालूम सरमिसळण या कथनरूपात आहे. या रूपबंधास स्थळ, प्रदेश, व्यक्ती तसेच घटनाप्रसंगांच्या मनोहारी गुंफणीतून ललितशैलीची अनोखी परिमाणे लाभली आहेत. स्त्री दुःखशोषणाची जाण आणि अस्मिताभानाचा खोलवरचा प्रत्यय देणारी ही कादंबरी महत्त्वाची ठरते.
Acc. No. 34689
जैवविविधता हाच पृथ्वीतलावरील एक गूढ रंजक विषय आहे. विविध वनस्पती आणि प्राणी यांनी ही सृष्टी संपन्न आहे. लाखो जाती-प्रजातींचे प्राणी पृथ्वीतलावर सुखेनैव जगत असतात. त्यांच्या जीवनशैलीच्या विविधतेस पृथ्वीचं बहुढंगी पर्यावरणही कारणीभूत आहे. परिणामत: प्राण्यांच्या प्रजोत्पादन तहांतही अशीच विविधता आढळते.
पुनरुत्पादन प्रक्रियेस चालना देण्यासाठी लिंगभेदउत्क्रांती विकसित झाली, असा सर्वसाधारण सिद्धांत मांडला जातो. या सिद्धांतालाही काही वैज्ञानिकांचे आक्षेप आहेत. कारण अविकसित प्राण्यांत असा लिंगभेद नाही, तरीही त्यांचं पुनरुत्पादन कार्य व्यवस्थित चालू आहे. तसंच काही प्राण्यांमध्ये तर लिंगभेद असूनही अलैंगिक पद्धतीने पुनरुत्पादनाची क्रिया सुरू आहे.
मग प्राण्यांच्या पुनरुत्पादनासाठी लिंगभेद आवश्यक आहे का? असल्यास नर आणि मादी यांचा समागमही आवश्यक असतो का ? पुनरुत्पादनासाठी अंडी, बीजांडं यांची तरी जरुरी आहे का ? आणि यांपैकी कोणतीही व्यवस्था प्राण्यांत नसेल, तर ते प्राणी पुनरुत्पादनासाठी सक्षम असतात का नाही ? मग अशा विविध प्राण्यांच्या प्रजननासाठी निसर्गानं काय काय व्यवस्था रचल्या आहेत? असे अनेक प्रश्न सामोरे येतात आणि त्यांचा अभ्यास करताना कित्येक रंजक गोष्टी उकलत जातात.