पुस्तकाचे नाव : हिंदू
लेखक : भालचंद्र नेमाडे
हिंदू मध्ये आपल्याला आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेली, संवादात कोठेही न अडखळणारी सशक्त मराठी भेटते आणि दिपवून टाकते. या कादंबरीतली मराठी हा खरं तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरावा. प्रमाण भाषा आणि बोलीभाषा, संवादभाषा आणि निवेदनभाषा अशा भिन्न रूपामध्ये हिंदूमधली मराठी सहजगत्या वावरते. तिला जसे बोलीभाषांमविषयी 'पुरोगामी' प्रश्न पडत नाही, तसेच जुनी-नवी, शुद्ध- अशुद्ध यांचेही प्रश्न पडत नाहीत. स्वतःच्या कथनावर लेखकाचा विश्वास असला आणि निवेदनाची उर्मी असली की भाषा कशी साकारते याचा विस्फारून टाकणारा अनुभव ही कादंबरी देते...
पुस्तकाचे नाव: इंद्रजीत भालेराव यांची कविता
संपादक : भगवान काळे
प्रेमचंदांच्या साहित्यासंदर्भात एका समीक्षकाने असे मत नोंदवलेले आहे की, समजा काही कारणांमुळे उत्तर भारतातील सर्व ग्रंथालयामधून उत्तर प्रदेश च्या ग्रामीण जीवनासंबंधीचे विवेचन करणारी सर्वच पुस्तके किंवा यासंबंधीचे माहिती देणारे सर्वच स्त्रोत साहित्य नष्ट जरी झाले आणि प्रेमचंदांच्या १० कादंबऱ्या आणि १५० कथा जर शिल्लक राहिल्या तर केवळ एवढ्या साहित्याच्या आधारावर उत्तर प्रदेशची जवळ जवळ १०० वर्षांची ग्रामीण जीवनासंबंधीची सखोल माहिती या साहित्याच्या माध्यमाने सहज लिहिता येईल, एवढी ताकत प्रेमचंदांच्या साहित्याची आहे. अगदी याच भाषेत असे म्हणता येईल की, महाराष्ट्राच्या कृषीसंस्कृतीचा जर अभ्यास करावयाचा असेल, माहिती घ्यायची असेल, या कृषीजीवनाचे ताणतणाव समजून घ्यायचे असतील, येथील पीकपाण्याची अवस्था जाणून घ्यायची असेल, येथील धान्याची, गवताची माहिती करून घ्यायची असेल तर इंद्रजित भालेराव यांच्या कविता यासाठी पुरेशा आहेत. समृद्ध अशा कृषीसंस्कृतीस सर्जनात्मक पातळीवर नेवून व्यक्त करणारा हा अपवादात्मक कवी. कोठेच रोमँटिकता नाही, भाबडेपणा नाही, कृषी संस्कृतीची भलावणदेखील नाही. कृषी संस्कृतीचे वेगवेगळे कंगोरे, त्यातील अंतर्विरोध, मूल्यसंघर्ष, निसर्गाचे रौद्र रूप, सौंदर्याने नटलेले रूप, त्यातील वैविध्य, सर्व काही येथे आढळेल.
पुस्तकाचे नाव: प्रवासी पक्षी ( कुसुमाग्रजांची निवडक कविता)
संपादक : शंकर वैद्य
कविवर्य कुसुमाग्रज आणि आजवर कविता,नाटक, कादंबरी, कथा, ललित निबंध असे विविध प्रकारचे साहित्य लिहिले असून त्याद्वारे मराठी साहित्यात मोलाची भर घातलेली आहे. या सर्व साहित्यात त्यांचे काव्य आणि नाटक हे वाङमयप्रकार विशेष गाजलेले असून त्यांचा ठसा मराठी मनावर उमटलेला दिसतो. या दोहोतही कवितेचा ठसा अधिक खोलवर उमटलेला आहे असे जाणवते. हा ठसा केवळ रसिकांच्या मनावर उमटला आहे असे नाही तर कुसुमाग्रजांच्या सौंदर्यदृष्टीचा आणि शैलीचा संस्कार मराठी कवितेवर झालेला आहे, असेही आढळून येते. कुसुमाग्रजांची कविता ही, केशवसुतापासून निर्माण झालेल्या एका वैभवशाली कालखंडातला महत्त्वाचा भाग असून ती गेली जवळ जवळ साठ पासष्ठ वर्षे नवनवीन उमेश आणि बहरत राहिलेली आहे.
वीस वर्षातील कुसुमाग्रजांच्या कवितांचे स्वरूप या संकल्पना द्वारे वाचकांना एकत्रितपणे पहावयास मिळेल.
पुस्तकाचे नाव : माणदेशी माणसं
लेखक : व्यंकटेश माडगूळकर
स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य साहित्यात जे अक्षर-ग्रंथ निर्माण झाले झाले त्यात 'माणदेशी माणसं' चा समावेश होतो.या व्यक्तीचित्रात जुन्या कथेतील गोष्ट तर आहेच पण जीवनाच्या अस्सल गाभ्यालाच स्पर्श करणारी नवलकथेची किमयादेखील आहे. अंधारातून पहाट व्हावी,कळीचे फूल व्हावे इतक्या सहजतेने रेखाटलेली ही चित्रे अस्सल मराठी आहेत. दरिद्री माणदेशातील, सामान्य जीवनातील न संपणारे दुःख पाहिले की मन भांबावते. माणसे सुखासाठी धडपडतात, पण त्यासाठी ती जन्माला आलेली नसतात असा उदार विचार मनात येतो. जीवनातील ही कारुण्य माडगूळकरांनी कलावंतांच्या अलिप्ततेने टिपले आहे त्यामुळे त्यांची ही माणसे आपल्याला विसरता येत नाहीत. त्यांची आठवण झाली की ती मनाला अस्वस्थ करून टाकतात....
पुस्तकाचे नाव : गावकुसाबाहेरची माणसं
लेखक : लक्ष्मण गायकवाड
एका पारधी मुलाचे आई-वडील नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडले. त्यानंतर त्या मुलाला सरकारी भरपाईही मंजूर झाली. पण हे पारधी कुटुंब त्या गावचे रहिवासी नसल्याने ती भरपाई त्याला मिळू शकली नाही. एक माणूस म्हणून त्यांना त्यांचे हक्क, अधिकार कधी मिळणार..?
पुस्तकाचे नाव : मृत्युंजय
लेखक : शिवाजी सावंत
असा हा कर्ण, भीष्माच पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रान पूर्वीच त्याची कवच-कुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केली होती.
परशुरामानी 'तुला ऐन युद्धप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फुरणार नाही.' असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावर च्या ब्राह्मणाचे 'तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात अशीच रुतून ठेवील!' हे उदगार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण मरणाच्या दारात एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करून जाणत होता - पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!
पुस्तकाचे नाव : वपुर्झा
लेखक: व.पु. काळे
'वपुर्झा' हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी!
हे पुस्तक कसं वाचायचं? एका बैठकीत? अथ ते इती? एका दमात? छे! मुळीच नाही. काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलावर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असतात जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं किंवा जसा मूड व्हावसा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं. हे पुस्तक असंच वाचायचं. हवं ते पान आपआपल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं.
एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर? पुन्हा शोधायचा. ह्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काहीही दिलेलं नाही.
पुस्तकाचे नाव: इडा पिडा टळो
लेखक: आसाराम लोमटे
आसाराम लोमटे यांच्या कथा या आजच्या उध्वस्त होत चाललेल्या ग्राम समाजातील कोसळण्याच्या कथा आहेत. त्यांच्या कथातील दुःखाच्या स्फोटाचे स्वर आपलं अंतकरण घुसळून टाकतात. या दुःखांच्या मीती, रिती आणि त्यांची घनता यांचं जडत्व आपल्याला खिळवून बांधून टाकतं.
मानवी समूहाचं खचून जाण, उख डलं जाणं या खेड्यांमधल्या आजच्या भीषण वास्तवाचं अत्यंत भेदक चित्र लोमटे यांच्या कथांमधून उभ राहतं. या कथांच्या दीर्घत्वान, त्यांच्या समूहकेंद्री असण्यानं त्यात भरच पडते. आपल्याला भावनिक जडत्वावर प्रहार करणाऱ्या या स्वास्थ्यहारक कथा म्हणून फार महत्त्वाच्या आहेत.
पुस्तकाचे नाव : II छत्रपती संभाजी II एक चिकित्सा
लेखक : जयसिंगराव पवार
छत्रपती संभाजी महाराज मराठ्यांच्या इतिहासातील एक पराक्रमी व्यक्तिमत्त्व या संभाजीराजावर अन्याय कोणी केला?... रायगडावरील गृहकलह का सुरू झाला?... संभाजी राजे दिलेरखानास का मिळाले?...संभाजी राजांनी प्रधानांना का शिक्षा केली?... संभाजी राजे मृत्यूला सामोरे कसे? गेले... या अनेक प्रश्नांची चिकित्सा प्रस्तुत ग्रंथात करण्यात आले आहे.
पुस्तकाचे नाव: महानायक
लेखक विश्वास पाटील
आपल्या अवघ्या ४८ वर्षाच्या कारकिर्दीत सुभाषचंद्र इतिहासाच्या नभांगणात तेजाने तळपून गेले आहेत. नोव्हें १९४५ मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यात आझाद हिंद फौजेच्या खटला गाजला.२० व्या शतकातील क्वचितच एखाद्या भारतीय नेत्याचे जीवन असे वाद शौर्य पूर्ण आणि नाट्यमय प्रसंग आणि खचाखच भरलेले असेल अशा नेताजींची अपरिचित जीवनकहाणी...
पुस्तकाचे नाव: कृष्णाकाठ
लेखक : यशवंतराव चव्हाण
गेल्या चाळीस वर्षात राज्य विधानसभेची धरून, दहा निवडणुका मी लढवल्या. कधी चुरशीच्या, कधी थोड्या मतांनी, तर कधी बिनविरोध अशा सर्व निवडणुका मी जिंकल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीचा अनुभव वेगळा, राजकीय कसोटया वेगळ्या, त्यावेळचे विरोधी राजकीय पक्षही वेगळे, अशा होत्या. पण १९४६ सारखी सर्वमान्य निवडणूक कधीच झाली नाही. ही आणि नाशिकची पार्लमेंटची निवडणूक सोडली, तर माझ्या सर्व निवडणुका मोठ्या वादळी होत्या. प्रतिपक्षांनी आपापल्या मुलुखमैदानी तोफा डागल्या होत्या. अभद्र आणि कटूतेच्या प्रचाराचा त्यांनी कळस केला. या सर्व निवडणुकात माझा सर्वात मोठा प्रचारक माझा मीच असे.संभाषणशैलीतील मनमिळाऊ, सुसंस्कृत,तत्त्वनिष्ठ आणि प्रांजळ प्रचार ही माझी मोठी शक्ती आहे, असे माझ्या लक्षात आले; आणि या सर्व वादळात जनतेच्या आशीर्वादाने व माझ्या कार्यकर्त्या मित्रांच्या संघटित सहकार्याने मी अपराजित ठरलो. लोकशाहीच्या राजकारणात याच्यापेक्षा अधिक काय अपेक्षा करायची!
पुस्तकाचे नाव : एक होता कार्व्हर
लेखक : वीणा गवाणकर
अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणाऱ्या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरनी दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक...
पुस्तकाचे नाव : उपरा
लेखक : लक्ष्मण माने
'जे जगलो, जे भोगलं.
अनुभवलं,पाहिलं,
ते तसंच लिहित गेलो.
पुन्हा एकदा तेच जगणं
जगत गेलो.
'पिढ्यान पिढ्या बिऱ्हाड पाठीवर घेऊन
गाढवाचं जिणं
जगणाऱ्या मंडळींच्या वेदना,
हे पुस्तक वाचून,
समाज समजावून
घेऊ शकला तरी
खूप झालं.'
पुस्तकाचे नाव: गौतम बुद्ध चरित्र
लेखक: कृ.अ.केळुस्कर केळुसकर
- बुद्ध हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे.बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नानी मिळवली आहे. संबुद्ध म्हणजे बुद्धत्व- संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतःचा उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध,आणि संमासंबुद्ध म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला.), स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमूनी गौतम बुद्धां ना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच संमासंबुद्ध मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.
पुस्तकाचे नाव : नेहरू व बॉस : समांतर जीवनप्रवास
लेखक : रुद्राक्ष मुखर्जी
आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या दोन परस्पर विरोधी व्यक्तिमत्वांची लक्षवेध कहाणी...
पुस्तकाचे नाव: सूर्यकोटी समप्रभ दृष्टा अणूयांत्रिक डॉ. अनिल काकोडकर
लेखक : अनिल पाटील
भारतासारख्या विकसनशील देशात अनुयज्ञांचे कुंड धगधगते ठेवणे हे दिव्य होते.आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा, महासत्तांच्या दबावाचा बागुलबुवा न करता भारताचा अणूकार्यक्रम तडीला नेणाऱ्या शास्त्रज्ञांच्या फळीत अग्रणी असलेल्या माणसाची ही खरी गोष्ट.
छान उपक्रम!
ReplyDeleteछान माहिती आहे.
ReplyDeleteKhup chan mahiti aahe sir thank you🙏🙏
Deleteश्री सुनील भोसले सरांनी ऑनलाईन ग्रंथप्रदर्शन या माध्यामातून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा खूप छान प्रकारे प्रकट केला आहे.
ReplyDelete